Friday, 15 October 2021

पाणलोट क्षेत्र विकास : ग्रामीण विकासाचा पाया

 पाणलोट क्षेत्र विकास : ग्रामीण विकासाचा पाया

प्रा. पवार अलोक अर्जुन अलका

ग्रामीण भागाचा विकास करणे हे आपण भारतीयांच्या समोरचे एक मोठे आव्हान आहे. भारतातील ७०% जनता शेती आणि शेतीसदृश व्यवसायावर आपली गुजराण करते त्यामुळे ग्रामीण भागातील सर्व गोष्टींचा विकास करणे गरजेचे आहे असे म्हणावयास हरकत नाही. मग ग्रामीण भागाचा विकास करणे म्हणजे नक्की काय करणे? ग्रामीण भागातील एकंदरीतच सर्व व्यवस्था शहरी भागातील सोई प्रमाणे दर्जेदार करणे, सुसज्ज रस्ते, हवाई मार्ग, मेट्रो सारख्या सोई, बाजारपेठा हे सर्व शहरी भागाप्रमाणे करणे. उत्तर आहे अजिबातच नाही. 

ग्रामीण भागाच्या गरजा या शहरी भागातील गरजांपेक्षा अतिशय वेगळ्या स्वरूपाच्या असतात. ग्रामीण भागातील व्यक्तींचे राहणीमान, शिक्षणाची गरज, बाजारपेठा, रोजगाराचे स्वरूप या संपूर्णपणे शहरी जीवनमानापेक्षा वेगळे असतात. शहरी भागातील अत्याधुनिक साधन सामग्री मुळे सर्व गोष्टी ठीक ठिकाणी उपलब्ध अशा बघायला मिळतात. त्याच ग्रामीण भागात हवे त्या मुबलक प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारांत उपलब्ध असतीलच असे नाही. 

सर्वात जास्त ग्रामीण भागातील गरज म्हणजे पाणी. या भागातील शेती किंवा अन्य रोजगाराची साधने एकूणच सर्व पाण्यावर अवलंबून असतात. मग हे पाणी नदीनाल्यापासून, विहिरीपासून किंवा अगदी पावसापासून मिळणारे असो, ग्रामीण भागातील लोकांना त्याच्या सोईनुसार उपलब्ध झाले पाहिजे. मात्र या भागातील लोकांना पाणी मिळण्यासाठी प्रामुख्याने दोन अडचणी येतात.

१. अवर्षण भाग : कोरडा दुष्काळजन्य परिस्थिती तयार होणे. पाण्याची उपलब्धता अजिबातच नसणे. नद्या, विहिरी कोरड्या पडणे. भूजल पातळी खालावणे आणि त्यामुळे बोअर, हापसा यांना देखील पाणी न येणे. शेतातील पिकांचे जळणे.

२. अतिपूरजन्य भाग : ओला दुष्काळ निर्माण होणे.घराघरांत पुराचे पाणी जाणे. जीवितहानी मध्ये मनुष्य आणि प्राणिमात्रांच्या नुकसानीला सामोरे जाणे. शेतातील पिकांचे नुकसान होणे. जमिनीवरील मृदा एका बाजूने पुराच्या प्रवाहाने वाहून दुसरीकडे जाणे. 

या अशा अनेक प्रकारे ओल्या व कोरड्या दुष्काळाने ग्रामीण भागातील व्यक्तींचे नुकसान हे ठरलेले असते. हे नुकसान टाळण्यासाठी पाण्याचे नियोजन करणे हे ग्रामीण भागातील लोकांचे प्रमुख उद्देश आहे हे म्हणावयास हरकत नाही. मग हे नियोजन करणे हे एकट्याचे काम नाही. लोकसहभाग आणि एकूणच ग्रामीण भागातील सर्व लोक ज्यामध्ये लहानांपासून वृद्धांपर्यंत, स्त्री आणि पुरुष सर्वांचाच सहभाग गरजेचा असतो. ओल्या व कोरड्या दुष्काळाच्या अंती जर जीवितहानी झाली तर आपत्ती व्यवस्थापनास पाचारण करावे लागते. मात्र समस्या ही समस्याच बनून राहते. 

या सर्वांवर महत्वाचा उपाय म्हणजे पाणलोट क्षेत्र कार्यरत करणे. त्यासाठी मोहिमा उभारणे. आखणी करणे व एकंदरीतच पाण्याचे क्षेत्र विस्थापित करणे. 

अजूनही बऱ्याच ग्रामीण भागात पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की काय हे ग्रामीण जनतेला पाहिजे तितके माहिती नाही आणि त्यामुळे पाणी नसण्याची समस्या तेथे उपलब्ध होते. सुरवातीला आपण पाणलोट क्षेत्र म्हणजे नक्की काय ते समजावून घेऊ. 

आपल्याला पाण्याचे चक्र म्हणजे काय हे माहिती आहेच, तरी एक थोडक्यात पाणी चक्र समजावून घेऊ. सूर्याच्या उष्णतेने समुद्राच्या पाण्याच्या वाफा होतात. या वाफा आकाशाच्या दिशेने मार्गक्रमण करतात. थंड झाल्यावर त्याचे ढगात रूपांतरण होते. समुद्री वाऱ्यामुळे हे ढग जमिनीच्या दिशेने वाहतात. डोंगर, किंवा मोठ्या झाडांच्या मार्गात येण्याने ढग पुढे वर्षावृष्टी करतात. हा पाऊस सर्व भागात पडतो. नद्या, विहिरी व भूजल पातळी देखील पावसाने एकंदरीत वाढते. मात्र नियोजनाच्या अभावी हे सर्व पाणी प्रवाहित होत असते. 


प्रवाहित होते म्हणजेच ते नद्या नाले किंवा भूगर्भातील मार्गाद्वारे पुन्हा समुद्राकडे वाहते. मधल्या मार्गात म्हणजे नदीच्या बांधावर, धरणांद्वारे हे नदीचे पाणी अडवले जाते. व त्या त्या ठिकाणी ते विविध कामांसाठी वापरले जाते. मात्र जर जास्त प्रवाह असल्यास धरणामध्ये साठवून ठेवता येत नाही व हेच पाणी पुढे कोणत्याही कामास न वापरता येऊन फक्त वाहून जाते.

पाणलोट याच्या विरुद्ध कार्य करते, जे पाणी डोंगरकडून सरळ वाहून जाते त्याला संथ वाहून किंवा अडवून त्याच प्रवाहात उशिरा पोहोचविणे अशी कामे करते. म्हणजेच पावसाचे पाणी नदिमार्फत समुद्राच्या दिशेने वाहून न जाता ज्या भागात ते पडते त्याच भागात भूगर्भात त्याची साठवणूक करून भूजलाची पातळी वाढविणे हे पाणलोट व्यवस्थापनाचे महत्वाचे कार्य आहे. 

पाणलोट क्षेत्राचे प्रामुख्याने तीन भाग पडतात. 

१) डोंगर माथ्यावरील चढाची रेषा (रिज लाईन)

२) प्रवाह

३) संगमाचा बिंदू / उताराची रेषा ( आउटफॉल लाईन)

वरील तीन घटकांनी एक पाणलोट क्षेत्र तयार होते.असे पाणलोट प्रवाहाच्या मार्गात पुढे दुसऱ्या पाणलोट क्षेत्रात संगमात विलीन होतात व मोठे पाणलोट क्षेत्र तयार होते.

पाणलोट क्षेत्राच्या आकारावरून त्याचे काही प्रकार देखील पडतात.

१) मिनी पाणलोट

२) मायक्रो पाणलोट

३) सब पाणलोट

४) पाणलोट 

५) सब कॅचमेन्ट

६) नदीचे खोरे ( महाराष्ट्रात एकूण अशी सहा नद्यांची खोरी उपलब्ध आहेत)

पाणलोट क्षेत्रात पुढील काही संसाधनांचा एकमेकांवर अत्यंत प्रभावी फरक पडतो असे म्हणावयास हरकत नाही, ज्यामध्ये जल, जमीन, आणि जंगल हे नैसर्गिक संसाधन, जनावरे हे पशु संसाधन, तर जनता हे मानवी संसाधन इत्यादी घटक मोडतात. पाणलोट क्षेत्राच्या योग्य व्यवस्थापनामुळे वरील पाचही 'ज' प्रभावित होऊन जातात. 


पाणलोट क्षेत्राच्या उत्तम व्यवस्थापनाने बऱ्याच समस्या दूर होतात. मी पुण्यातील यशदा च्या माध्यमातून जायगाव, ता कोरेगाव, जिल्हा सातारा येथे भेट दिली. समस्त गावकऱ्यांनी एकत्र येऊन जे पाणलोट क्षेत्र निर्माण केले आहे त्यातून आज गावकरी वेगळाच आनंद उपभोगत आहेत. गावकऱ्यांनी सरकारी योजनेच्या माध्यमातून व संपूर्ण गावकऱ्यांनी एकत्र मिळूनच कष्टाने पाणलोट क्षेत्र तयार केले आहे. गावकरी या सर्वांचे श्रेय श्री. प्रदीप गारोळे यांना देतात. त्यांनी दिलेली चालना यातून जायगावाचे रूपच वेगळे बघायला भेटते. संपूर्ण जायगावकरांनी पुढाकार घेतला पाणी फाउंडेशन च्या स्पर्धेत सहभाग देखील घेतला एकदा नाही तब्बल दोनदा दोन वर्षे पारितोषिके मिळवली. या पाणलोट विकास करण्याच्या बाबतीत लहान मुले तर मदतीला आलेच मात्र अगदी आबाळ वृद्ध देखील मागे नव्हते त्यांनी देखील कष्टकरी जवान तरुण तरुणांना कष्ट करते वेळी पाणी जागेवर नेऊन देण्याचे चोख काम केले. जायगाव करांनी दाखवून दिले की लोकसहभागाशिवाय हे शक्य नाही. जे जायगाव काही वर्षांपूर्वी अगदी ओसाड किंवा शिक्षेचे गाव म्हणून प्रसिद्ध होते तेच गाव आज पुढील गावांसाठी पाण्याची सोय करते आहे.

पाणलोट व्यवस्थापन आणि विकासाचे फायदे

१. स्थलांतर रोखले जाते: प्रत्येक जण उन्नतीसाठी रोजगार आणि शिक्षण या गोष्टींसाठी प्रगती साठी पाहत असतो. शेतीमधून रोजगाराच्या संधी असतात. पण शेती ही पूर्णपणे पावसावर म्हणजेच अप्रत्यक्षपणे पाण्यावर अवलंबून असते. ग्रामीण भागात जर पाण्याची उपलब्धता नसेल बहुतांशी तरुण शहराकडे धाव घेतात. जर पाणलोट व्यवस्थापन गावात पाण्याची उपलब्धता करून देत असेल तर स्थलांतर रोखले जाते.

२. स्त्रियांचे प्रश्न सुटतात: स्त्रियांना गृहकामासाठी जबाबदार असल्याने त्यांना गृहिणी असे देखील म्हणले जाते. मग या घरकामात त्यांना सर्वात जवळचे म्हणजे पाणी. धुणे, भांडी, स्वयंपाक या आदी स्त्रियांच्या कामास पाण्याची साथ हवीच. म्हणून स्त्रिया या पाण्याच्या शोधपायी नेहमीच फिरताना दिसतात. मग जर गावात पाणी नसेल तर पाण्यासाठी लांबवरच्या विहिरी किंवा पाण्याच्या सोईंसाठी स्त्रियांनाच भटकावे लागते. डोक्यावर, खांद्यावर पाण्याचे हंडे कळशी आणताना स्त्रियांना मणक्याचे किंवा छाती पाठीचे भविष्यातील दुखणे सुद्धा ओढवू शकतात. घरातील इतर लागणारे पाणी याची सोय सुद्धा स्त्रियांनाच करावी लागते, स्वच्छता किंवा अगदीच सौचास लागणारे पाणी याची सोय देखील स्त्रिया करतात. मग सधन कुटुंबातील एखादी मुलगी अशा गावात लग्नच करायचे नाही जिथे पाणी नाही त्यामुळे सांसारिक व्यवस्थेला देखील अडचणी उद्भवू शकतात. पाणलोट विकास म्हणजे स्त्रियांसाठी एक पर्वणीच आहे म्हणावयास हरकत नाही. स्त्रिया पाणी असेल तर पाणी भरणे, ते लांबून आणणे यापेक्षा स्व उन्नतीकडे सहज लक्ष देऊ शकतात. ग्रामीण भागातील स्त्रिया बचतगटांच्या माध्यमातून संसाराला हातभार लावू शकतात.

३. शेतीसाठी पूरक: शेती ही पाण्याशिवाय फुलत नाही. एखाद्याकडे जमीन असेल पण पाणीच नसेल तर त्या व्यक्तीकडे असलेली जमीन ही वाळवंट यापेक्षा वेगळं काहीच नसते. बारा महिने पाणी असलेल्या शेतकऱ्याचा जो रुबाब असतो तो काहीसा निराळाच असतो. पाणलोट व्यवस्थापन केलेला शेतकरी हा नेहमीच रुबाबात वावरतो. पिके घेणे, पिके बदलणे जमिनीला कसणे यातून जमिनीची धूप थांबते, रोजगार वाढतो, धान्य, भाजीपाला, फळे, फुले हे योग्य प्रमाणात मिळतात. 

४. पशुपालनास उपयुक्त: मनुष्य या प्राण्यांप्रमाणेच इतरही प्राणीमात्रांना पाणी अत्यावश्यक असते. ग्रामीण भागातील पशुपालन व तत्सम व्यवसाय करणाऱ्या लोकांना त्यांच्या कडील पशु पक्षांसाठी पाण्याची नित्तांत गरज भासते. बीड अहमदनगर मधील चारा छावणी तील पशूंची पाण्याविना काय हालत होते व चारा छावणी तिथे कसे वरदान आहे हे तेथील दुष्काळी अनुभवावरून कळते. शेळ्यांमेंढ्या, गाय बैल, म्हशी किंवा अगदी कुक्कुटपालन करणाऱ्यांना देखील भरपूर पाणी लागते. त्यामुळे उत्तम पाणलोट अशा ठिकाणी वरदान ठरते. पाणलोट क्षेत्रामुळे पाळीव प्राण्यांची तहान तर भागतेच. त्या शिवाय वन्य पशु पक्षी यांना देखील पाणलोट क्षेत्र पाण्यासाठी पूरक ठरते.

५. स्वच्छता आणि आरोग्य : आज बऱ्याच ठिकाणी सरकारी खर्चातून शौचालये बांधली जातात, 'हर घर शौचालय' असे नारे दिले जातात. पण पाण्याच्या अभावाने शौचालयाकडे निघणारी स्वारी पुन्हा शेताकडे वावरात प्रस्थापित होते. त्यापुढे डास माशांच्या प्रादुर्भावाने रोगराई कशी पसरते हे वेगळे सांगायला नको.त्यामुळे स्वच्छतेच्या कार्यात पाण्याचे महत्व अतिशय जास्त आहे. पाणी न पिण्याने किंवा कमी पाणी पिल्याने मुतखडा, किंवा असे अनेक रोग पुढे येतात. दूरवरचे साठलेले पाणी पिण्याने वेगळे रोग ज्यामध्ये हगवण, कॉलरा, ज्वर किंवा अन्य त्वचारोग देखील होऊ शकतात. या सर्वांवर पाणलोट क्षेत्र वरदान ठरत आहे.

६. विद्यार्थी दशेत मदत: पाण्याचा अभाव जसा मोठ्यांना त्रासदायक ठरतो तसे विद्यार्थी दशेतही त्याचे दुष्परिणाम दिसून येतात. पाणी नसल्या कारणाने लहान मुलांना देखील पाणी भरण्याची कामे करावी लागतात. शिवाय योग्य रोगप्रतिकारक क्षमता नसल्याने पाण्याअभावी विविध रोगांना देखील बालकांना सामोरं जावे लागतात. त्यामुळे शिक्षणाच्या वयात विदयार्थी आपला अमूल्य वेळ पाणी मिळवणे यासाठी वाया घालवतात. पाणलोट क्षेत्र या विद्यार्थ्यांना देखील मदतीचे ठरते.

पाणलोट क्षेत्राचे यापलीकडे जाऊन देखील फायदे आहेत. पण ज्या अशा दुर्गम भागात पाणी नाही तेथे पाण्याची सोय होते ते त्यांच्याकडून अनुभव आलेले काहीसे वेगळे.

पाणलोट क्षेत्र विकसित करण्यासाठी प्रत्येकाने प्रत्येक व्यक्तीने सहभाग घेतला पाहिजे तर तो अधिकाधिक फायदेशीर होतो.

Introduction to Rural Development

 Introduction to Rural Development Dr. Alok Pawar Concept of Rural Development - Meaning and Definition Scope and Importance of Rural D...