राष्ट्रीय शेतकरी दिन
प्रा. अलोक अर्जुन अलका पवार
आज २३ डिसेंबर २०२० राष्ट्रीय शेतकरी दिन. आपल्या देशाचे पाचवे दिवंगत पंतप्रधान चौधरी चरण सिंग यांच्या जन्मदिवसाच्या निमित्त हा दिन साजरा केला जातो. त्यांनी शेतकरी बांधवांसाठी ज्या सुविधा केल्या त्यातून हा दिवस त्यांच्या नवे अर्पण केला जातो. या दिनानिमित्त केलेले हे टिपण...
पूर्वी म्हणे आपल्याकडे सोन्याचा धूर निघत होता, ही सोन्याची जी उपमा दिली आहे ती नक्की कशाला हे आपण जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. पुण्यावर जेंव्हा संकट आले, पुण्याची अवस्था बिकट झाली होती त्याच वेळी जिजाऊ लहान शिवबा ला घेऊन पुण्यात दाखल झाल्या होत्या, त्यांनी पाहिले काम केले ते म्हणजे सोन्याचा नांगर फिरवून इथल्या जमिनीला कसले आणि त्यातून पुण्याच्या मातीला सकस बनवले. इतिहासात पण जेव्हा जनक राजा सोन्याचा नांगर घेऊन जमीन कसतो तेंव्हा त्याला जमिनीच्या कुशीतून सीता भेटते. आणि हीच सीता पुढे रामाची पत्नी बनण्याच्या आधी शेतीतील तंत्र मंत्र लोकांना अवगत करताना दिसून येते. शिवाजी महाराजांची देखील शेतकऱ्यांवर आस्था काही कमी दिसून येत नाही, शत्रूवर आक्रमण करताना कधी रात्रीच्या वेळी शत्रूवर कूच करण्याची वेळ आली तर शेतकऱ्यांच्या शेतातून जावे लागायचे, तेंव्हा शेतकऱ्याच्या एका पिकाला धक्का लागता कामा नये अशी महाराजांची त्यांच्या मावळ्यांना ताकीद असायची. बळीराजा असो, सीता माई असो, शिवाजी महाराज असो, किंवा नुकतेच बीजमाता पुरस्कार भेटलेल्या राहीबाई पोपेरे असो हे सर्वजण कुठे ना कुठे तरी शेतकऱ्यांचे नेतृत्व करताना दिसतात.
भारतातील रोजगाराचे सर्वाधिक वाटेकरी असणारे क्षेत्र म्हणजे कृषीक्षेत्र. भारतातील निदान ७०% लोक शेती किंवा शेतीला पूरक असे व्यवसाय करतात. मात्र हाच शेतकरी कधी कधी पाऊस नाही म्हणून कोरड्या दुष्काळाने त्रस्त असतो तर कधी अतिपाऊस झाला आणि लावलेल्या शेतमाळाचे नुकसान झाले म्हणून त्रस्त दिसतो. तर कधी अगदी टोळधाडीने केलेल्या नुकसानाला पण हा शेतकरी सामोरे जाताना दिसतो. तो शेतकरी, तो पोशिंदा सर्व गोष्टी होऊनसुद्धा कधी खचत नाही. आणि पुन्हा उभा राहायचे धाडस दाखवत असतो. इकडे माझ्या - आपल्यासारखे शहरी लोक आंब्याचे भाव वाढले, काय मेथी आतून सडकी निघाली अशा चोखंदळ भूमिका घेत असतो. मात्र या आंबाच्या भाव वाढीला डिसेंबर जानेवारी मध्ये एन मोहोर फुलण्याच्या वेळी पाऊस पडून गळलेले मोहोर आपल्याला अजिबात दिसत नाही.
आपल्या शेतकरी राजाचे ज्याला काही लोक सन्मानाने अगदि बळीराजा म्हणतात, त्याचे आजचे चित्र थोडे विदरलेले दिसून येते. हे भयानक रूप इतक्या ज्वलंतपणे समोर येते की शेतकरी आत्महत्या असे काहीसे चित्र आपल्याला समोर दिसते. शेतामध्ये बऱ्याच सुधारणा झालेल्या दिसून येतात. म्हणजे बैलाच्या सहाय्याने बैलगाडी किंवा नांगर घेऊन जो शेतकरी शेताची मशागत करायचा तो शेतकरी आता टॅक्टर आणि बऱ्याचश्या नवीन - नवीन यंत्रणा घेऊन शेतात मशागत करतो. मात्र तरीही त्याने केलेल्या शेतमालाला योग्य बाजारभाव भेटतो का यावर विचार करण्यासारखे आहे. प्रत्येक शेतकरी भरपूर माल पिकवत असेल आणि त्याला तो माल ठेवण्यासाठी पुरेशी जागेची सोय नसेल, उच्चतम गोदामांसारखी यंत्रणा नसेल तर तो हवालदिल होतो. आणि त्यात त्याने पिकविलेला माल हा जर नाशवंत पिकांमधील असेल तर त्याची हालत होते.
मध्ये मी आणि माझा एक मराठवाड्वियातील विद्यार्थी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी परीक्षा नियंत्रक डॉ. अरविंद शाळीग्राम यांना भेटलो होतो. डॉ. शाळीग्राम हे मुळचे इलेक्ट्रॉनिक विषयतज्ञ. मात्र ते आणि आम्ही एका अग्रो कॉन्फरन्स मध्ये भेटलो होतो. आमच्या गावाला पावसामुळे अतिशय हालत होते. कमी पाऊस पडल्यामुळे पाहिजे तसे पिक घेता येत नाही. असे आम्ही त्यांच्याकडे अगदीच रडगाणे सांगत होतो. तेंव्हा त्यांनी अगदी मोजक्या शब्दात आम्हाला काही प्रश्न विचारणा केली, जसे की कधीतरी जेंव्हा पाऊस पडतो तेंव्हा जे पाणी तुमच्या शेतात मुरते त्याचे बाष्पीभवन होऊ नये म्हणून काय प्रयत्न केले जातात? जे पाणी शेतात किंवा घरात वापरले जाते त्याची विल्हेवाट कशी लावली जाते. त्यांच्या या प्रश्नांने पावसाचा एक एक टिपका किती महत्वाचा आहे असे जाणवते. त्यांचीच एक विद्यार्थिनी म्हणजे मला इलेक्ट्रॉनिक शिकवणाऱ्या डॉ. वर्षा बापट या देखील इलेक्ट्रॉनिक या विषयातील असून त्यांची पीएचडी शेतकऱ्यांच्या फायद्याची कशी ठरेल यावर आधारलेली दिसून येते. शेतकऱ्यांना शेतीमध्ये बऱ्याचदा पाखरे किंवा प्राणी यांचा नाहक त्रास सहन करावा लागतो. डॉ. बापट यांनी इलेक्ट्रॉनिकमधील यंत्रणेचा वापर करून अशा काही गोष्टी आपल्या संशोधनातून समोर आणल्या की त्या पाखरांना किंवा प्राण्यांना पण काही त्रास नाही होणार आणि शेतीचे पण नुकसान होणार नाही.
शेतकरी या विषयावर आज संपूर्ण भारतभर चर्चा करणे अपेक्षित आहे. कोरोना चा कालखंड बघितला तर सर्व क्षेत्रे बंद होती मात्र कृषी क्षेत्र अखंड पणे अविरत पणे चालू होते. कृषीक्षेत्राशी जोडलेल्या सर्व सेवा अविरत पणे चालू होत्या. बऱ्यापैकी सर्व क्षेत्रातल्या व्यक्ती नोकरी सोडून घरी बसलेल्या किंवा नवीन आलेल्या वर्क फ्रॉम होम या पद्धतीने काम करीत होत्या. शेतकरी मात्र शेतामध्ये जाऊन आपली चोख व्यवस्था बजावत होता.
नवीन युवा पिढीने त्यांचे शिक्षण किंवा त्यांच्या शिक्षणातून येणारे ज्ञान हे जर कृषी क्षेत्राशी जोडले तर नक्कीच आपण कृषी क्षेत्रात आपल्या भारताचे पाय भक्कम रोवू शकतो. म्हणजे एखादे कोणत्याही शाखेतील शिक्षण हे कृषीक्षेत्राशी जोडून कृषी व्यवसाय पुढे कसा आणता येईल याकडे सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष दिले पाहिजे. मग शेती हा तर अग्रस्थानी आहेच. त्यापुढे कृषी विपणन, कृषी क्षेत्राला बँकेकडून मिळणाऱ्या संधी, कृषी संप्रेषण, कृषीचे माहिती तंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रचार - प्रसारण, कृषिविषयक कायदे, कृषीचा उत्तम इतिहास, कृषी संबंधातील राजकारणी नेते आणि त्यांनी बजावलेल्या भूमिका, कृषीक्षेत्रातील स्त्रिया आणि त्यांचे प्रश्न, कृषिविषयक नवीन तंत्रज्ञान, नाशवंत पिकांसाठी सोयीच्या गोष्टी, दुध आणि दुग्धजन्य पदार्थांचे आधुनिकीकरण, शेतीव्यवसायात प्राणी पक्षांच्या किंवा पाखरांचा त्रास होऊ नये म्हणून नवीन इलेक्ट्रोनिक यंत्रणांनी केलेले प्रयोग (जो डॉ. बापट या त्यांच्या संशोधनाद्वारे जगासमोर मांडत आहेत), शेतीमधील गणिते, शेतीसाठी हवामानाचे शास्त्र असे अनेक विषय विद्यार्थी अभ्यासू शकतील. शेतीमधून मिळणारे अर्थशास्त्र आणि त्याद्वारे जे कृषीवाणिज्य निर्माण होते हे तर जुने विषय आहेतच. या सर्व विषयांमधून भरघोस प्रगती झाली तर नक्कीच शेतकरी आपल्या मार्गाने वाट काढू शकतो. आणि त्याला नेहमीच स्वतच्या संशोधनाने पुढे जाता येईल. चला भारतात जन्मलो आहे. आपण भारतभुमीचे म्हणजेच एका कृषिप्रधान देशाचे सुपुत्र आणि सुकन्या आहोत. आपल्या शेतकरी बांधवाला पण सोबत घेऊन या देश घडविण्याच्या कार्यात सहभागी व्हा.
चला शेताकडे चला..
आजच्या दिवशी मी एका शेतकरी कुटुंबामध्ये जन्म घेतल्याचा मला अभिमान आहे. माझे आजोबा दत्तात्रय दगडूजी पवार हे ठाण्यामध्ये शिरोळा या गावात भातशेती करायचे. माझी आजी देखील त्यांना या शेतकामात पुरेपूर साथ द्यायची. त्यानंतर आमचे वडिल कुंडलिक कोल्हे, बंधू अविनाश कोल्हे, मातोश्री आशा कोल्हे यांचे देखील आभार मानतो कारण त्यांच्यामुळे मला शेतातील समस्या समजून घेता आल्या.माझे हे बीडचे कुटुंब मला नेहमीच शेती समजून घेण्यास मदत करते.


No comments:
Post a Comment